पुणेरी पंडित

Puneri Wisdom Digitized and Networked

पुणेरी पंडित header image 1

15 August–Independace Day

August 15th, 2010 · Social

१५ ऑगस्ट म्हणजे काय?

आपल्या झोपडपट्टीच्या गल्लीसमोर भर रस्त्यात स्पीकरची बॅरिकेड उभी करून
त्यावर आज देशभक्तीची तर काही दिवसांनी गणपतीची तर कधी शिवाजी महाराजांची
गाणी मोठ्याने लावून आपण मित्रांबारोबर चकाट्या पीटण्याचे स्वातंत्र्य

मांडववाले, बॅनरवाले आणि ब्लडबँकवाले यांना गोळा करून दुसऱ्याच्या रक्तावर
पुण्य कमावण्याचे सामाजिक कार्यकर्त्याचे स्वातंत्र्य

चालत्या बस मधून थुंकण्याचे, रस्त्याच्या उजव्या बाजूने जाऊन रस्ता जाम करण्याचे
कितीही शिकलो तरी गाडी चालवताना मोबाईल वापरण्याचे स्वातंत्र्य

थोड्याश्या डीझेलच्या बचतीसाठी रस्त्याच्या उजव्या बाजूने जाऊन
निरपराध माणसांचे जीव घेण्याचे स्वातंत्र्य

पाट्या वाचून सुद्धा बसच्या लोकलच्या दारात उभे राहून अपघाती मरण्याचे स्वातंत्र्य

धोकादायक रसायन कंपनीचा परिसर, नदीच्या पुराची सीमा या सारख्या ठिकाणी
गरीबी आणि अंतर यांची सबब सांगून घर बांधण्याचे आणि
गॅसच्या धुरात किंवा  पुराच्या पाण्यात मरण्याचे स्वातंत्र्य

आपण कितीही फुटकळ नोकरी करत असलो तरी कर्ज काढून शहराच्या
मध्यवस्तीत काही हजार लोकांना बोलावून जेवू घालण्याचे स्वातंत्र्य

नवरदेवाला सजवून त्याच्या वरातीच्या निमित्ताने किंवा देवाला रस्त्यावर आणून
त्याच्या मिरवणूकीच्या, नवरात्रीच्या तोरण महोत्सवाच्या निमित्ताने
मागे शेकडो गाड्यांचे इंधन वेळ वाया घालवून
त्यांच्यापैकी कुणी थोडा जरी विरोध केला तर त्यांच्यावर
अर्वाच्य शिवीगाळ करण्याचे स्वातंत्र्य

शिवाजी महाराज, बाबासाहेब यांना एकाच रंगात रंगवण्याचे आणि त्यांचा आपल्या
वर्तनात थोडाही अंश न दाखवण्याचे, त्यांच्याशिवाय आपल्या समाजात दुसरा
एकही नेता झाला नाही तरी लाज न वाटण्याचे स्वातंत्र्य

आपली कोठेही शाखा नाही हे अभिमानाने सांगण्याचे,
दुपारी एक ते चार दुकान बंद ठेवणाऱ्या मराठी माणसाला हसण्याचे
आणि तसेच वागणाऱ्या युरोपिअन लोकांचे गोडवे गाण्याचे स्वातंत्र्य

अल्पसंख्यांकांची बाजू ऐकताना बहुसंख्यांची वाट लावण्याचे, माणुसकीच्या नावाखाली
बेकायदा मतदारांवर कायद्याने चालणाऱ्या लोकांचे पैसे उधळण्याचे स्वातंत्र्य

बऱ्याचश्या पैशांसाठी आपल्याच देशाच्या लोकांची मारण्याचे,
देशाच्या गौरवाकारिता भ्रष्टाचार करणारयाला अभय देण्याचे पण
त्याच देशाला पदक मिळण्याकरिता काहीही न करण्याचे  स्वातंत्र्य

माझ्या देशाची संस्कृती महान म्हणुन तिच्या महानतेच्या पुराव्यावर थुंकण्याचे,
जगात सगळीकडे लबाड्या करण्याचे स्वातंत्र्य

आपल्याच देशाच्या पोलीसदलात एक महिला असून व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याचे
पण त्याच देशात चोरांनाही राजे म्हणुन संरक्षण द्यावे लागण्याचे स्वातंत्र्य

याच देशात कुठल्याही सन्मानाची अपेक्षा न करिता कुठेतरी जंगलात
आनंदवन निर्माण करण्याचे स्वातंत्र्य, दुसऱ्यांची जमीन सुपीक व्हावी म्हणुन
धरणात ज्यांची जमीन गेली त्यांच्या जागेकरिता लढण्याचे,
मोडक्या तोडक्या बंदुकांनी आणि फुसक्या जाकेटमधून
लढून अतिरेक्यांना पकडण्याचे स्वातंत्र्य

देशाच्या सरहद्दीवर शिपायांच्या पराक्रमावर अधिकाऱ्यांनी पदके मिळवण्याचे स्वातंत्र्य आणि असे अधिकारी मिळाले तरी आपल्या मातृभूमीला स्वतंत्र ठेवण्याचे स्वातंत्र्य

जय हिंद

→ 3 CommentsTags: ·

Marathi Songs and FM Radio

July 21st, 2010 · Entertainment, Music

कौशल इनामदार हा मराठी तरुण पिढीचा आघाडीचा संगीतकार. त्यांनी सुरेश भटांच्या गीताला एक अप्रतीम चाल लावली आणि मराठी भाषेच्या अभिमान गीताचा जन्म झाला. तो यावर नुसता थांबला नाही तर मराठी माणसांनी विचार केला नसेल असा पराक्रम त्याने या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी करून तो अमलात देखील आणला. अनेक गुणी पण अव्यावसायिक गायकांना एकत्र आणून आणि भारतातील उत्तम तंत्रज्ञांना (फक्त मराठी हवेत असा अवास्तव आग्रह न धरता फक्त उत्तम देण्याच्या ध्येयाने) एकत्र आणून या गाण्याला जन्माला घातले. एक माता जितक्या वेदना सहन करेल तितक्याच तळमळीने त्यांनी हे गीत मराठी लोकांसमोर सादर केले.

मराठी अभिमान गीत यु ट्यूब वर…

आता प्रश्न आला लोकांसमोर मराठी गाणी पोचवायचा. मुंबईमध्ये जवळजवळ सर्व रेडिओ वाहिन्यांनी म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्यांनी धंद्याचा काळजी पोटी मराठी गाणी लावत नाही असे कौशलला सांगितले. त्याने हा प्रश्न अनेक पद्धतीने लोकांसमोर मांडला पण अखेर शिवसेना प्रमुखांच्या तलवारीची भाषा कामी आली. यावर खूप उहापोह इंटरनेट वर झालं आणि होत राहील. आपण जर का सारेगमप किंवा इतर मराठी गाण्यांचे कार्यक्रम पहात असाल तर लक्षात येईल की मराठी गाण्याच्या विश्वात मध्ये एक अंधारा काळ आहे. या काळात फारसे दर्जेदार संगीत बनलेच नाही. आपण मराठी माणसे देखील लता, आशा, बाबुजी, खळेकाका, हृदयनाथ इत्यादींच्या पलीकडे गेलोच नाही. पुढच्या पिढीत अक्षरशः हाताच्या बोटांवर मोजण्याइतके चांगले संगीतकार झाले आणि त्यांना देखील दर्जेदार चित्रपट न आल्याने संधी मिळाल्या नाहीत. अनिल-अरुण, श्रीधर फडके, सुधीर मोघे, अशोक पत्की  अशा काही संगीतकारानंतर आताच्या पिढीतल्या सलील, अवधूत, अजय – अतुल यांच्या मध्ये फारश्या चांगल्या रचना झाल्याच नाहीत.

या सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे वाद्यवृंद. मराठी गाण्यात हा एक फार मोठा दुर्लक्षित भाग राहिला. काही मोजकी आणि तीच तीच वाद्ये, एखाद्या कारखान्यातून सतत तोच तोच जून माल बाहेर पडावा तशी गाणी आणि त्यावर अत्यंत गरीब आणि अशक्य डिझाईन चे कपडे घातलेले नायक नायिका (कल्पना करा लक्ष्या आणि अलका कुठल्या तरी बागेत) हे सगळे मराठीला फार मागे आणि “down market” ठरविण्यास कारणीभूत झाले. त्यातच भर म्हणजे मराठी गाणी. क्लिष्ट शब्द, त्याच त्याच उपमा आणि अलंकार आणि तेच तेच विषय. नायिकेला न साजेसे तिचे वर्णन किंवा त्याच त्याच लावण्या. मराठी लोकांना हिंदीचा एक सोपा पर्याय आहे त्यामुळे लोकांची भूक त्याने भागली आणि मराठी संगीत सृष्टी उपासमारीला लागली. बंगाली लोकांनी या काळात मात्र हिंदीला गायक आणि संगीतकारांचा पुरवठा केला तसेच दोन्ही भाषात या लोकांनी गाणी केल्याने त्यांना आपले वैभव टिकवणे सोपे गेले. मराठी मंडळीनी या काळात फक्त एक मोठी गायिका हिंदीला दिली अनुराधा पौडवाल. मराठी संगीतकारांना हिंदीची स्वप्ने पडलीच नसावीत किंवा त्यांचा तेवढा आवाका असल्याची कुणाला खात्री वाटली नसावी.

आज अनेक वर्षांनतर जशी मराठी सिनेमाने कात टाकली तशी मराठी संगीत देखील कात टाकत आहे. यात मुख्य वाटा नव्या पिढीच्या सहज सोप्या भाषेत लिहिलेल्या कविता/ गाणी (उदा. संदीप खरे, गुरु ठाकूर) आणि नव्या पिढीला आवडणाऱ्या वाद्य संगीताचे रचनाकार (उदा. अजय-अतुल, अवधूत) यांचा आहे. काहीतरी नवे ऐकायला मिळत आहे आणि प्रयोग होत आहेत. जेंव्हा नव्याची भूक भागते तेंव्हा मग तरुण वर्ग अभिजात संगीताकडे वळतो.  मराठी कान गेली कित्येक वर्षे जुन्यामाध्येच रमला होता. तो आता कुठे नवीन रचना ऐकू लागलाय. त्याला असेच सतत काही मिळाले म्हणजे नवीन लोकांना उत्साह येईल आणि या सगळ्यातून जी मरगळ निघून जात आहे टी अजून वेगाने पळून जाईल. अजय – अतुल आणि इतरही सर्व मराठी संगीतकारांनी, गायकांनी मराठी बरोबरच हिंदी सगीत क्षेत्रात भरारी मारायची स्वप्ने बघितली पाहिजेत आणि तिथे नाव मिळाल्यावरही मराठीत काम केले पाहिजे. संगीताला भाषा नसते पण गाण्याला ती लागते. जो मान सन्मान इतर भाषा मिळवतात तो काही लढाई करून नाही फक्त स्वाभिमान बाळगून. त्यामुळे मराठीचा अभिमान बाळगायलाच हवा.

→ No CommentsTags: ··