निसर्ग इतिहास आणि वास्तुकला

Natural History Museum
लंडनच्या नॅचरल हिस्टरी म्युझियममध्ये जाण्याचा नुकताच योग आला. नेमकी गुड फ्रायडे आणि ईस्टरची मोठी सुट्टी आल्याने प्रचंड गर्दी होती. गर्दीचा जसा त्रास होतो, वेळ जातो तसा बऱ्याचदा फायदा देखील होतो. अशा जगप्रसिद्ध जागी देशोदेशीचे लोक एकत्र बघायला मिळतात. बहुतेक जण त्यांच्या कुटुंबियांबरोबर असतात त्यामुळे वागण्यात मोकळेपणा असतो. पाश्चिमात्य जगात कुटुंबं आपल्यासारखीच एकमेकांना बांधून असतात, मुलांच्या खोड्या चालू असतात हे पाहतांना मजा वाटते आणि जग तितकेही काही वाईट नाही असा सकारात्मक विचार जाणवतो.
या गर्दीत वाट पाहतांना माझे लक्ष मध्येच कॅमेरा चालवण्याकडे वळले आणि या देखण्या इमारतीची छायाचित्रे घेताना मला लक्षात आली ती त्याच्या रचनेतील बारकावे व ज्या कारणाने ही इमारत बांधली त्याचे प्रतीक म्हणून कोरलेली सौंदर्यपूर्ण शिल्पे. खांबांवरील मधमाशीच्या पोळ्याचे षट्कोन, पाने, वेलबुट्ट्यांबरोबरच वेगवेगळे प्राणी व पक्षी यांचा अंतर्भाव या इमारतीची रचना करणारे वास्तुतज्ञ व त्यातील बारकावे साकारणारी कारागीर मंडळी यांना दाद आपोआप मनापासून निघते. ब्रिटिश साम्राज्याच्या या राजधानीत फिरताना सारखे हे वैभव यांनी माझ्या देशाला लुटून मिळवले अशी ठसठस मनांत रहाते पण जेंव्हा असा सौंदर्यपूर्ण अविष्कार व निसर्गासारख्या जागतिक विषयाचे ज्ञानभांडार समोर असते तेंव्हा त्या ठसठशीची तीव्रता खूप कमी होते.
अधिक छायाचित्रे

रेल्वे स्थानक आणि पियानो

St_Pancras_Piano
लंडनच्या सेंट पॅन्क्राज रेल्वे स्थानकावर असे दोन तीन पियानो आहेत जे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांपैकी हौशी मंडळी वाजवत असतात. काहीजण खरोखरच सुंदर वाजवतात तर काही हात साफ करून घेतात. गजबजलेल्या वातावरणात कोणी ऐकत असेलच अशी खात्री देता येत नाही त्यामुळे बहुतेक जण स्वानंदासाठीच वाजवतात. कधी त्याची पावती देणारा कोणीतरी भेटतो तर कधी आप्तमित्र प्रोत्साहन देतात. एवढ्या मोठ्या शहरात कलेचं वातावरण ठिकठिकाणी पहायला मिळतं. मागे न्यूयॉर्क मध्येही असाच अनुभव आला होता. रेल्वेत कला दाखवून पैसे मिळवणारे भारतातही असतात पण ते भीक मागतात. इथे सगळा बाज रियाजासारखा असतो. दिलेत पैसे तर वाहवा नाही तर आमची थोडी प्रॅक्टीस झाली. देणाऱ्याचं जन्मोजन्मीचं कल्याण वगैरे बात नाही. न्युयॉर्क मध्ये तर मेट्रोमध्ये हातात एक छोटा बॉक्स स्पीकर व त्याला मोबाईल फोन जोडून काही कृष्णवर्णीय मुलांनी उभ्या आडव्या बार्सना लटकून ज्या काही कसरती दाखवल्या की डोळ्याचं पारणं फिटलं. मध्ये एक टोपी ठेवली होती बस्. स्टेशन आल्यावर आपण त्या गावचेच नसल्यासारखी ती टोळी पसार झाली. अशा कसरतीत कृष्णवर्णीयांचा जास्तच गोतावळा दिसतो. पियानोला मात्र हौशी मंडळींचाच हात लागतो आणि त्यात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातला माणूस असू शकतो पण आखातातला किंवा भारतीय उपखंडातला माणूस क्वचितच किंबहुना नाहीच.