कौशल इनामदार हा मराठी तरुण पिढीचा आघाडीचा संगीतकार. त्यांनी सुरेश भटांच्या गीताला एक अप्रतीम चाल लावली आणि मराठी भाषेच्या अभिमान गीताचा जन्म झाला. तो यावर नुसता थांबला नाही तर मराठी माणसांनी विचार केला नसेल असा पराक्रम त्याने या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी करून तो अमलात देखील आणला. अनेक गुणी पण अव्यावसायिक गायकांना एकत्र आणून आणि भारतातील उत्तम तंत्रज्ञांना (फक्त मराठी हवेत असा अवास्तव आग्रह न धरता फक्त उत्तम देण्याच्या ध्येयाने) एकत्र आणून या गाण्याला जन्माला घातले. एक माता जितक्या वेदना सहन करेल तितक्याच तळमळीने त्यांनी हे गीत मराठी लोकांसमोर सादर केले.
आता प्रश्न आला लोकांसमोर मराठी गाणी पोचवायचा. मुंबईमध्ये जवळजवळ सर्व रेडिओ वाहिन्यांनी म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्यांनी धंद्याचा काळजी पोटी मराठी गाणी लावत नाही असे कौशलला सांगितले. त्याने हा प्रश्न अनेक पद्धतीने लोकांसमोर मांडला पण अखेर शिवसेना प्रमुखांच्या तलवारीची भाषा कामी आली. यावर खूप उहापोह इंटरनेट वर झालं आणि होत राहील. आपण जर का सारेगमप किंवा इतर मराठी गाण्यांचे कार्यक्रम पहात असाल तर लक्षात येईल की मराठी गाण्याच्या विश्वात मध्ये एक अंधारा काळ आहे. या काळात फारसे दर्जेदार संगीत बनलेच नाही. आपण मराठी माणसे देखील लता, आशा, बाबुजी, खळेकाका, हृदयनाथ इत्यादींच्या पलीकडे गेलोच नाही. पुढच्या पिढीत अक्षरशः हाताच्या बोटांवर मोजण्याइतके चांगले संगीतकार झाले आणि त्यांना देखील दर्जेदार चित्रपट न आल्याने संधी मिळाल्या नाहीत. अनिल-अरुण, श्रीधर फडके, सुधीर मोघे, अशोक पत्की अशा काही संगीतकारानंतर आताच्या पिढीतल्या सलील, अवधूत, अजय – अतुल यांच्या मध्ये फारश्या चांगल्या रचना झाल्याच नाहीत.
या सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे वाद्यवृंद. मराठी गाण्यात हा एक फार मोठा दुर्लक्षित भाग राहिला. काही मोजकी आणि तीच तीच वाद्ये, एखाद्या कारखान्यातून सतत तोच तोच जून माल बाहेर पडावा तशी गाणी आणि त्यावर अत्यंत गरीब आणि अशक्य डिझाईन चे कपडे घातलेले नायक नायिका (कल्पना करा लक्ष्या आणि अलका कुठल्या तरी बागेत) हे सगळे मराठीला फार मागे आणि “down market” ठरविण्यास कारणीभूत झाले. त्यातच भर म्हणजे मराठी गाणी. क्लिष्ट शब्द, त्याच त्याच उपमा आणि अलंकार आणि तेच तेच विषय. नायिकेला न साजेसे तिचे वर्णन किंवा त्याच त्याच लावण्या. मराठी लोकांना हिंदीचा एक सोपा पर्याय आहे त्यामुळे लोकांची भूक त्याने भागली आणि मराठी संगीत सृष्टी उपासमारीला लागली. बंगाली लोकांनी या काळात मात्र हिंदीला गायक आणि संगीतकारांचा पुरवठा केला तसेच दोन्ही भाषात या लोकांनी गाणी केल्याने त्यांना आपले वैभव टिकवणे सोपे गेले. मराठी मंडळीनी या काळात फक्त एक मोठी गायिका हिंदीला दिली अनुराधा पौडवाल. मराठी संगीतकारांना हिंदीची स्वप्ने पडलीच नसावीत किंवा त्यांचा तेवढा आवाका असल्याची कुणाला खात्री वाटली नसावी.
आज अनेक वर्षांनतर जशी मराठी सिनेमाने कात टाकली तशी मराठी संगीत देखील कात टाकत आहे. यात मुख्य वाटा नव्या पिढीच्या सहज सोप्या भाषेत लिहिलेल्या कविता/ गाणी (उदा. संदीप खरे, गुरु ठाकूर) आणि नव्या पिढीला आवडणाऱ्या वाद्य संगीताचे रचनाकार (उदा. अजय-अतुल, अवधूत) यांचा आहे. काहीतरी नवे ऐकायला मिळत आहे आणि प्रयोग होत आहेत. जेंव्हा नव्याची भूक भागते तेंव्हा मग तरुण वर्ग अभिजात संगीताकडे वळतो. मराठी कान गेली कित्येक वर्षे जुन्यामाध्येच रमला होता. तो आता कुठे नवीन रचना ऐकू लागलाय. त्याला असेच सतत काही मिळाले म्हणजे नवीन लोकांना उत्साह येईल आणि या सगळ्यातून जी मरगळ निघून जात आहे टी अजून वेगाने पळून जाईल. अजय – अतुल आणि इतरही सर्व मराठी संगीतकारांनी, गायकांनी मराठी बरोबरच हिंदी सगीत क्षेत्रात भरारी मारायची स्वप्ने बघितली पाहिजेत आणि तिथे नाव मिळाल्यावरही मराठीत काम केले पाहिजे. संगीताला भाषा नसते पण गाण्याला ती लागते. जो मान सन्मान इतर भाषा मिळवतात तो काही लढाई करून नाही फक्त स्वाभिमान बाळगून. त्यामुळे मराठीचा अभिमान बाळगायलाच हवा.