आज आनंदी आनंद झाला – Google Transliteration

मी आज खूप खुश आहे आणि याला कारण म्हणजे गुगलनी नवा टायपिंग चा फंडा विंडोज वर उपलब्ध करून दिला आहे. Transliteration च्या माध्यमातून आणि त्याला शब्दासंग्रहाची जोड देऊन आपण लिहीत असलेल्या नेहमीच्या रोमन लिपीतल्या मराठी शब्दाना आता देवनागरी लिपीची जोड मिळाली आहे. आता मला मराठी भाषेत लिहिणे खुपच सोपे झाले आहे मला खरेतर इन् स्क्रिप्ट कीबोर्ड येत होता आणि त्यावर माझा स्पीड पण चांगला आहे. पण रोज इंग्रजी मध्ये टाईप केल्याने त्यात फार काही वाढ होत नव्हती. माझी आहे तीच सवय कायम ठेऊन त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन गुगल ने मराठी आणि इतर आणखी काही भारतीय भाषा भगिनींना जागतिक नकाशावर आपला ठसा उमटवणे आणखी सोपे केले आहे.

मायक्रोसॉफ्ट असाच काही प्रयत्न अरेबिक भाषेकरिता करत आहे. आणि मला खात्री आहे की या शर्यतीत ते मागे राहणार नाहीत. स्पर्धा कायमच तुम्हाला काहीतरी नवीन आणि चांगले करण्यास भाग पाडते. आणि त्याचा फायदा जर जगाला होत असेल तर त्या बद्दल या अमेरिकी कंपन्याना धन्यवादच दिले पाहिजेत. आज या कंपन्यात हजारो भारतीय काम करत आहेत आणि त्यामुळेच आपली आणि आपल्या भाषांची दखल घेतली जात आहे. या साऱ्याचा फायदा आपल्या देशातील असंख्य लोकांना, ज्यांना इंग्रजी भाषा येत नाही किंवा जुजबी येते, अशांना संगणक साक्षर होण्याकरता नक्कीच होईल आणि या कारणाने भारताची प्रगती आणखी कैक पटीनी वेगात होईल असे मला ठामपणे वाटते.

आपणालाही जर माझ्याप्रमाणे मराठीत टाईप करायचे असेल तर गुगल च्या या पानावर जा. आणि हे सोफ्टवेअर डाउनलोड करण्याकरता या पानावर जा.