लंडनच्या सेंट पॅन्क्राज रेल्वे स्थानकावर असे दोन तीन पियानो आहेत जे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांपैकी हौशी मंडळी वाजवत असतात. काहीजण खरोखरच सुंदर वाजवतात तर काही हात साफ करून घेतात. गजबजलेल्या वातावरणात कोणी ऐकत असेलच अशी खात्री देता येत नाही त्यामुळे बहुतेक जण स्वानंदासाठीच वाजवतात. कधी त्याची पावती देणारा कोणीतरी भेटतो तर कधी आप्तमित्र प्रोत्साहन देतात. एवढ्या मोठ्या शहरात कलेचं वातावरण ठिकठिकाणी पहायला मिळतं. मागे न्यूयॉर्क मध्येही असाच अनुभव आला होता. रेल्वेत कला दाखवून पैसे मिळवणारे भारतातही असतात पण ते भीक मागतात. इथे सगळा बाज रियाजासारखा असतो. दिलेत पैसे तर वाहवा नाही तर आमची थोडी प्रॅक्टीस झाली. देणाऱ्याचं जन्मोजन्मीचं कल्याण वगैरे बात नाही. न्युयॉर्क मध्ये तर मेट्रोमध्ये हातात एक छोटा बॉक्स स्पीकर व त्याला मोबाईल फोन जोडून काही कृष्णवर्णीय मुलांनी उभ्या आडव्या बार्सना लटकून ज्या काही कसरती दाखवल्या की डोळ्याचं पारणं फिटलं. मध्ये एक टोपी ठेवली होती बस्. स्टेशन आल्यावर आपण त्या गावचेच नसल्यासारखी ती टोळी पसार झाली. अशा कसरतीत कृष्णवर्णीयांचा जास्तच गोतावळा दिसतो. पियानोला मात्र हौशी मंडळींचाच हात लागतो आणि त्यात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातला माणूस असू शकतो पण आखातातला किंवा भारतीय उपखंडातला माणूस क्वचितच किंबहुना नाहीच.